रत्नागिरीत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार
- by Yogesh Bandagale
- October 27, 2025
- 92 views
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे भव्य, आकर्षक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकासाठी आणि रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांच्या अनुदानाचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आनंद मराठे, विजय पेडणकर, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, बंड्या साळवी, राजू तोडणकर, प्रमोद रेडीज, मुन्ना सुर्वे, शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, “या मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि ठेकेदारांची राहील.” त्यांनी सांगितले की रत्नागिरीच्या पर्यटन विकासात आता जलदगतीने नवी भर पडत आहे.
शिवसृष्टी, क्रिकेट स्टेडियम, बौद्ध विहारही विकासाच्या मार्गावर
पालकमंत्र्यांनी रत्नागिरीतील विविध महत्त्वाच्या विकासकामांचा उल्लेख करताना सांगितले की,
-
छत्रपती शिवाजी महाराजांची अरबी समुद्र किनाऱ्यालगत उभारलेली शिवसृष्टी आतापर्यंत 1 लाख 20 हजार पर्यटकांनी पाहिली आहे.
-
देशातील पहिले अंडरआर्म क्रिकेट स्टेडियम रत्नागिरीत बांधले जात असून त्याला कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात येणार आहे.
-
राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम बौद्ध विहार येथे उभारला जात आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर ‘नमो उद्यान’ संकल्पनेनुसार रत्नागिरीत दिव्यांगांसाठी विशेष उद्यान 1 कोटी खर्चातून तयार होत आहे.
“पुढील एकादशीपर्यंत विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण होणार”
डॉ. सामंत म्हणाले, “मी दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विठ्ठल मंदिराचे सुशोभीकरण पुढील एकादशीपर्यंत पूर्ण होईल. विकास हा सामूहिक प्रयत्नातूनच होतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे.”
कार्यक्रमात श्री. मयेकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविकात जितेंद्र विचारे यांनी सुशोभीकरण योजनेचा सविस्तर आढावा मांडला.
