युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे पारितोषिक वितरण समारंभ
- by Yogesh Bandagale
- February 19, 2026
- 141 views
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीसंचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण या शाळेचा द्वितीय पारितोषिक वितरण समारंभ १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात दुपारी १ वाजता कार्यक्रमास प्रारंभ झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून चिपळूणमधील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. सौ. अनुपमा गणेश जोशी उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संचालक व शाळा समिती अध्यक्ष विजयजी चक्रदेव, संचालक अभयजी चितळे तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुदेश माळी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व मुख्याध्यापक संजय बनसोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शिक्षक प्रतिनिधी मोटगी सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला, तर मंगेश खेडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेच्या वतीने विजय चक्रदेव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन डॉ. जोशी यांचा सन्मान करण्यात आला.
अभ्यासासोबतच कला, सांस्कृतिक उपक्रम, बागकाम, सदाचारी आचरण, वक्तृत्व, निबंध लेखन, कथाकथन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ८५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुण्या डॉ. अनुपमा जोशी यांनी आपल्या मनोगतात शाळेतील संस्कारांमुळेच आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली असल्याचे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रातील यशाचे श्रेय शाळा व शिक्षकांना देत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनाही प्रेरणादायी संदेश दिला.
मुख्याध्यापक संजय बनसोडे यांनी प्रमुख पाहुण्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत अशा विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान असल्याचे नमूद केले. महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि इच्छाशक्ती यांचा संगम म्हणजे डॉ. जोशी असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पर्यवेक्षिका कारदगे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. बक्षिसांचे वाचन वैशाली चितळे व सोळुंके मॅडम यांनी केले, तर सूत्रसंचालन सूर्यवंशी सर यांनी केले.
इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
