युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणचे वार्षिक स्नेहसंमेलन ३० व ३१ डिसेंबर रोजी

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार व बुधवार, दिनांक ३० व ३१ डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात संपन्न होणार आहे.

मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन, चित्र प्रदर्शन व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३ वाजता इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर रोजी सकाळी पावणेआठ वाजता रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 या कार्यक्रमाला ओंकार बापट, उदयकुमार सन्नाक आणि योगेश बांडागळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी योगेश बांडागळे कोकणातील लोककलांवर आधारित कार्यक्रम सादर करणार असून उदयकुमार सन्नाक विद्यार्थ्यांसमोर जादूचे प्रयोग सादर करतील. तर ओंकार बापट हे निसर्ग वाचनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत.

या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी शतांशु शिंदे व वेदिका कदम यांनी केले आहे.

संबंधित लेख