मुर्तवडे येथे विजेचा धक्का बसून एका व्यक्तीचा मृत्यू; जखमींना शासनाकडून तातडीची मदत
- by Yogesh Bandagale
- October 17, 2025
- 271 views
चिपळूण : मुर्तवडे येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या विजेच्या अपघातात सुग्रीव शिवराम पवार (रा. मुरूडवडे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच मृत झाले. मृताच्या पत्नी श्रीमती श्रेया सुशील पवार यांना शासनामार्फत तात्काळ चार लाख रुपयांची (₹४,००,०००) आर्थिक मदत देण्यात आली आहे. संबंधित धनादेश क्रमांक २८०३७६ असून दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी चिपळूण मा. आकांक्षा लिंगाडे यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार चिपळूण श्री. प्रविण लोकेरे, मंडळ अधिकारी, तसेच महसूल व ग्राम महसूल अधिकारी मुरूडवडे उपस्थित होते.
दरम्यान, या विजेच्या धक्क्यामुळे परिसरातील काही जण जखमी झाले असून, शासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. किरणकोळ जखमींना आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येकी ४५०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – श्री. उत्तम भिका पवार, श्रीमती उर्मिला उत्तम पवार, श्री. संदीप लक्ष्मण पवार, श्रीमती सुजाता रामदास पवार आणि श्री. रोशन रामदास पवार (सर्व रा. मुरूडवडे). या पाच जखमींना मिळून एकूण २२,५०० रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने जलद कार्यवाही करून केवळ २४ तासांच्या आत मृत आणि जखमींना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. प्रशासनाच्या या तत्परतेचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून, अशा प्रसंगी शासनाने दाखवलेली संवेदनशीलता ही जनतेसाठी दिलासादायक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
