मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ; रो-रो सेवेला नवे थांबे मिळणार
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 32 views
मुंबई: मुंबईतून कोकणात पोहोचण्यासाठी सध्या रस्तेमार्गे १० ते १३ तासांचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरावा यासाठी प्रशासनाने रो-रो (Roll-on Roll-off) सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना आता ट्रेनमधूनच आपले वाहन घेऊन कोकणात जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने या ‘कार ऑन ट्रेन’ सेवेची सुरुवात केली होती. मात्र या नव्या उपक्रमाला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने या सेवेत सुधारणा करत आणखी तीन स्थानकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सुमारे ७,७०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वेने ३५ वा स्थापना दिन साजरा केला असून, त्याच वेळी रो-रो सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी नवे उपक्रम जाहीर करण्यात आले.
पूर्वी कोलाड, नांदगाव रोड आणि वेर्णा येथून या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र अतिरिक्त थांबे नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. विशेषतः रत्नागिरी आणि सावंतवाडी येथील प्रवाशांनी अतिरिक्त थांब्यांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे रो-रो ट्रेनसाठी रॅम्प बांधण्याचे काम नियोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.
रो-रो ट्रेनमध्ये १० डब्यांचे वॅगन आणि दोन प्रवासी कोच असून, एका प्रवासात ४० कार वाहून नेण्याची क्षमता आहे. या नव्या थांब्यांच्या समावेशामुळे कोकणातील प्रवाशांना अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
