महिला सशक्त झाल्यास समाज सक्षम – राज्यमंत्री योगेश कदम; ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत फणसू येथे शिबीर
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 48 views
दापोली : “महिला सशक्त झाल्यास समाजदेखील अधिक सक्षम होतो,” असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
दापोली तालुक्यातील फणसू प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना आरोग्यासोबतच शिक्षण व स्वयंपूर्णतेची दिशा देणे हे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य व सशक्तीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. महिलांना शासनाच्या विविध योजना, हक्क आणि कायदेशीर संरक्षणाची माहितीही यातून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाचे उद्दिष्ट आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन व सुरक्षितता याबाबत जनजागृती करणे आहे. शिबिरात महिला व बालकल्याण, पोषण, स्वच्छता आणि स्वावलंबन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रक्तदाब, मधुमेह, रक्तगट तपासणी, माता व बालकांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
