महावितरणच्या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांचा महावितरणमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार महावितरणचे निवृत्त कर्मचारी दिलीप आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे पिताश्री स्वर्गीय धोंडीराम सकपाळ हे महावितरणमध्ये सेवेत होते. त्यांच्या सोबत काम केलेले अनेक निवृत्त कर्मचारी यावेळी उपस्थित होते. “महावितरणच्या वायरमनचा मुलगा नगराध्यक्ष झाला” याचा विशेष आनंद व अभिमान असल्याची भावना अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
स्वर्गीय धोंडीराम सकपाळ हे महावितरणच्या पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन होते. त्या काळातील आठवणींना यावेळी उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण अनेकांनी सांगितली. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे महावितरण कुटुंबात त्यांचा सन्मान आजही कायम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

महावितरणच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मार्गी लावावेत, अशी अपेक्षा यावेळी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडे व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनीही सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख