मंगेश बांडागळे यांची उद्योजक अजयभाऊ पित्रे यांना सदिच्छा भेट

देवरुख : हातिव पंचायत समिती सदस्यपदी नुकतेच निवडून आलेले श्री. मंगेश रमेश बांडागळे यांनी मुरादपूर येथील ज्येष्ठ उद्योजक श्री. अजयभाऊ पित्रे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. निवडीनंतर मतदारसंघातील मान्यवर, उद्योजक व समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींना भेटून मार्गदर्शन घेण्याच्या उपक्रमांतर्गत ही भेट पार पडली.

या भेटीदरम्यान मंगेश बांडागळे यांनी अजयभाऊ पित्रे यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला व आशीर्वाद घेतला. पंचायत समिती सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर विकासकामांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योजक अजयभाऊ पित्रे यांनी मंगेश बांडागळे यांचे अभिनंदन करून पंचायत समिती स्तरावर रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व युवकांसाठी रोजगारनिर्मिती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसेच सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासकामे राबविल्यास मतदारांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

या प्रसंगी पत्रकार योगेश बांडागळे, संदीप बांडागळे, वामन बांडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनीही मंगेश बांडागळे यांना शुभेच्छा देत आगामी कार्यकाळासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.

दरम्यान, पंचायत समितीच्या माध्यमातून मतदार संघातील प्रलंबित कामांना गती देत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास मंगेश बांडागळे यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख