भर रस्त्यात पत्नीला लोखंडी साखळीने मारहाण; पती-सासूविरोधात गुन्हा
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 177 views
रत्नागिरी : पतीच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोन नंबर आढळल्यानंतर झालेल्या वादातून भर रस्त्यात पत्नीला पती व सासूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पती व सासूविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास गयाळवाडी येथे वडापावच्या गाडीजवळ घडला. फिर्यादी निधा श्वेतांग वायंगणकर (वय २७, व्यवसाय – गृहीणी, रा. विनायक बंगला, गयाळवाडी) यांनी त्याबाबतची तक्रार त्याच दिवशी रात्री ९.३१ वाजता ग्रामीण पोलिसांत नोंदवली.
तक्रारीनुसार, पती श्वेतांग प्रदीप वायंगणकर (वय ३१) याचा मोबाईल पाहताना काही मुलींचे फोन नंबर मिळाल्याने दांपत्यामध्ये वारंवार वाद होत होते. त्याचाच राग धरून श्वेतांग याने भर रस्त्यात पत्नी निधाला लोखंडी साखळीने तसेच हाताने मारहाण केली. त्यात हात-पाय व पाठीवर गंभीर मार बसला. त्यानंतर सासू प्रार्थना प्रदीप वायंगणकर (वय ५८) ही तेथे येऊन तिनेही लाकडी बांबूने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याशिवाय, आरोपी श्वेतांग वायंगणकर याने पत्नीला ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी पती व सासू या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
