एक अवलिया नाना…

वामनमूर्ती व्यक्तिमत्त्व, शब्दांचा गोडवा, तरुणालाही लाजवेल असा उत्साह, विनोदी वृत्ती आणि अनुभवाची झालर लाभलेले बोलणे—या साऱ्या गुणवैशिष्ट्यांनी भरलेले आमचे नाना म्हणजे विजय महादेव केळस्कर.  (31) ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

छोटी प्लेझर आणि नाना, दुधाच्या किटल्या आणि व्यवसाय—हे समीकरण म्हणजे एक अजब रसायनच! कापसाळ येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले नाना नोकरी सांभाळत व्यवसायही तितक्याच जबाबदारीने सांभाळत आले. “माझ्या व्यवसायाचा परिणाम मी कधीच नोकरीवर होऊ दिला नाही,” असे ते अभिमानाने सांगतात. अनेकदा पहाटे चार वाजता उठून गुरे-वासरे आटपून मग कामावर जाण्याचा त्यांचा दिनक्रम असे. कोकणी माणसात असलेली जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि रापलेपणा नानांच्या स्वभावात ओतप्रोत भरलेला आहे.

जबाबदारीचे भान, सामाजिक जाणीव आणि नियोजनबद्ध कामकाज हे नानांचे विशेष. शालेय कार्यक्रम असो वा एखादी जबाबदारी—नानांना सांगितली की निश्चिंत व्हावे, इतक्या काटेकोरपणे ते काम पूर्ण करायचे. ‘ना’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच. नाना म्हणजे कायम होकार. एखादी गोष्ट सांगायची राहिली, तरी ती आधीच करून मग आपल्या विनोदी आणि शेलक्या शैलीत सांगायचे—“हे सांगायचं राहून गेलं होतं, पण मी केलंय बरं का!” अनुभवाचा मोठा साठा त्यांच्या पाठीशी कायम होता.

नानांच्या सेवायात्रेची सुरुवात ७ जून १९९४ रोजी परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या शिशुविहार येथे झाली. १९९६ ते १९९९ या काळात त्यांनी प्राथमिक विभागात काम केले. १९९९ ते ४ एप्रिल २००७ पर्यंत संस्थेमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर २००७ पासून अनुदानित युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिपाई पदावर त्यांनी सेवा बजावली. तब्बल ३२ वर्षांची निष्ठावान सेवा त्यांनी दिली. उन्हाळा-पावसाळा अनुभवत, काळानुसार बदल स्वीकारत ते अधिकाधिक परिपक्व होत गेले. तत्कालीन मुख्याध्यापकांच्या सहवासातून त्यांना अधिक प्रगल्भता लाभली.

नानांच्या संसाररूपी वृक्षवेलीवर वीणा, ओंकार आणि अभिषेक ही तीन फुले उमलली. त्यापैकी वीणाचे शुभमंगल झाले आहे. ओंकार आणि अभिषेक यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांनी स्वावलंबी केले; ते आज नोकरीत स्थिरस्थावर झाले आहेत. “माझी आई जनाबाई आणि पत्नी सौ. वर्षा यांच्या सहकार्यामुळे हा संसाराचा गाडा सुरळीत चालू आहे,” असे नाना अभिमानाने सांगतात.

निवृत्तीनंतरही नानांच्या आयुष्याला थांबा नाही. गोसेवा करण्याचा त्यांचा मानस असून दोन गायी खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शेतीकडे अधिक लक्ष देत, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर काय? हा प्रश्न नानांसमोर कधीच उभा राहिला नाही.

नाना, तुमच्या पुढील वाटचालीस युनायटेड परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

मंगेश जयंत मोने

संबंधित लेख