भगवान कोकरे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 222 views
खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संस्थेचे संस्थापक भगवान कोकरे यांच्यावर आधीच गुन्हा दाखल असताना, आता आणखी एका अल्पवयीन मुलीने तक्रार दिल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
या नवीन तक्रारीनुसार खेड पोलिस ठाण्यात भगवान कोकरे आणि त्यांचा सहकारी प्रितेश कदम यांच्याविरोधात पोस्को कायद्यान्वये कलम 4, 8 तसेच BNS कलम 64(2)(1), 65(1), 74, 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भगवान कोकरे आणि प्रितेश कदम यांना पहिल्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या नव्या तक्रारीनंतर दोघांवर आणखी गंभीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वारकरी शिक्षण आणि अध्यात्माच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप झाल्याने धार्मिक व सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू असून संबंधित मुलींना समुपदेशन व कायदेशीर मदत देण्यात येत आहे.
