प्रभाग १० मध्ये महायुतीचे कपिल शिर्के यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- November 30, 2025
- 65 views
चिपळूण : येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०मध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आघाडीकडून कपिल शिर्के धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी लढवत असून, प्रभागभर त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे. तरुण, तडफदार, अभ्यासू आणि नागरिकांच्या अडीअडचणींना तत्काळ प्रतिसाद देणारे कार्यकर्ते म्हणून शिर्के प्रभागात ओळखले जातात.
कपिल शिर्के यांनी सांगितले की मतदारांनी विश्वास दाखवून निवडून दिल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल. “रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलू. महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देऊ,” असे ते म्हणाले. तसेच प्रभागातील फळभाजी मार्केटची रचना, सुविधांची उभारणी व जागेचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी मी २४ तास उपलब्ध असेन. कोणतीही समस्या आली तर तात्काळ धाव घेईन,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कपिल शिर्के यांनी अडचणींवेळी केलेल्या कामांमुळे त्यांच्याविषयी नागरिकांत चांगली भावना आहे. मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान पाईपलाइन फुटून घरे पाण्याखाली जाण्याची समस्या अनेकवेळा निर्माण झाली तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरून ठेकेदाराला जागेवर आणून समस्या सोडवली होती. २०२१ च्या महापुरात त्यांनी साफसफाई, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, मदत साहित्य, वैद्यकीय मदत अशा अनेक माध्यमांतून नागरिकांना हातभार लावला. नारायण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी त्यांनी केली असून स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे चालू रुंदीकरण वेळेत पूर्ण करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे.
शिर्के यांनी प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. योगिता डेंटल कॉलेजच्या सहकार्याने भव्य दंत तपासणी शिबिर, महिला वर्गासाठी नवरात्र संवाद व नवदुर्गा यात्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दिवाळी साजरी, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायण तलाव येथे पाणपोईची उभारणी—हे सर्व उपक्रम त्यांनी उत्साहाने राबवले. अतिरिक्त कचरा हटवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून काम करून घेणे, नारायण तलावाची स्वच्छता राखणे, प्रभागातील समस्या वेळेवर सोडवणे—या सर्व गोष्टींमुळे त्यांची प्रतिमा 'नेहमी उपलब्ध असणारा कार्यकर्ता' अशीच राहिली आहे.
मागील निवडणुकीतील पराभवानंतरही न खचता त्यांनी प्रभागातील नागरिकांमध्ये सातत्याने काम केले आणि पुन्हा एकदा उत्साहाने मैदानात उतरताच त्यांना प्रभाग १० मधून मिळणारा जोरदार प्रतिसाद त्यांच्या विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल होत असल्याचे संकेत देत आहे.
