श्रीराम विद्यालयात राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा उत्साहात
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 118 views
शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त भव्य आयोजन
वेरवली (ता. लांजा) : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय, तु. पु. शेटये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल येथे ‘शैलेश रमेश डोळस विद्यानगरी’ नामकरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात व कलात्मक वातावरणात संपन्न झाली.
या स्पर्धेसाठी ‘पोर्ट्रेट (व्यक्तिचित्र)’ हा विषय देण्यात आला होता. भारतीय खेळाडू, चित्रपट व नाट्य कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी व देवदेवता यांपैकी एका विषयावर रांगोळी साकारण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. प्रत्येक रांगोळीत रंगसंगती, कलात्मकता आणि प्रभावी संदेश यांचा सुरेख मिलाफ दिसून आला.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी श्री किरण बेर्डे, श्री अजित गोसावी व श्री संदीप सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राज्यभरातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी जागतिक कीर्तीचे शिल्पकार स्वर्गीय राम सुतार, अभिनेत्री मधुबाला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सुभेदार तानाजी मालुसरे, अभिनेते धर्मेंद्र, शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच माननीय श्री शैलेश डोळस यांची कलात्मक रांगोळी साकारली.
स्पर्धेचे निकाल
-
प्रथम क्रमांक : विलास रहाटे (देवरुख) – स्वर्गीय राम सुतार यांची रांगोळी
-
द्वितीय क्रमांक : अभिषेक सुतार (भांडुप) – सुभेदार तानाजी मालुसरे
-
तृतीय क्रमांक : किशोर पांचाळ (मुंबई) – ऑपरेशन सिंदूर
-
उत्तेजनार्थ : शर्वरी धनुकार (अमरावती) – ‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराज
प्रथम क्रमांकाला ११,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला ९,००० रुपये, तृतीय क्रमांकाला ७,००० रुपये, तर उत्तेजनार्थ ३,००० रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला मुख्याध्यापक श्री. अरुण डोळे, संस्थाध्यक्ष मा. श्री दादा डोळस, सचिव मा. श्री संतोष पडवणकर, सहसचिव श्री सुरेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री विजय साळसकर, श्री पंढरी गुरव, श्री जयवंत जाधव, श्री अमोल बोडस, श्री रविंद्र शिंदे, श्री सुरज कुडतडकर, तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
स्पर्धकांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही स्पर्धा दोन दिवस चालली, तर २७ डिसेंबर रोजी रांगोळी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. पंचक्रोशीसह लांजा तालुक्यातील अनेक कलारसिक व नागरिकांनी रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. संस्थेच्या या भव्य उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
परीक्षक श्री अजित गोसावी यांनी कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन करत आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी ज्येष्ठ शिक्षक श्री प्रदीप लाड, श्री श्रुतीक प्रभुलकर व सौ. नीलिमा जाधव यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री प्रदीप लाड यांनी केले.
