पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र बापाला मारहाण; संशयितावर गुन्हा दाखल
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 66 views
रत्नागिरी : पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून सावत्र बापाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन भिवा पवार (वय ३८, मूळ रा. पानवल होरंबेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी गंगाराम गनू घोडेकर (वय ७६, मूळ रा. पणोरे नरसरीवाडी, ता. लांजा; सध्या रा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, गंगाराम घोडेकर हे भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी सायंकाळी भिकेतून जमा झालेले पैसे रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात बसून मोजत असताना त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन पवार तेथे आला व खर्चासाठी पैसे मागू लागला. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या अर्जुनने गंगाराम घोडेकर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हाताने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
