‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ : दशकपूर्ती कीर्तनमालेचा चिपळुणात शुभारंभ

चिपळूण : गेली दहा वर्षे श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कीर्तनमालेच्या माध्यमातून विद्यावाचस्पती ह.भ.प. चारूदत्तबुवा आफळे यांनी समाजासमोर दुर्लक्षित राहिलेला इतिहास प्रभावीपणे उलगडून दाखविला आहे. त्यांनी दिलेली विचारसूत्रे अभ्यासण्यासारखी असून, ती आत्मसात करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार व संतसाहित्याचे अभ्यासक श्री. धनंजय चितळे यांनी केले.

शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ या दशकपूर्ती कीर्तनमालेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढील पाच दिवसांत पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडताना आफळेबुवांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. आफळेबुवा हे दृष्टी देणारे, अभ्यासू व तळमळीचे कीर्तनकार असल्याचे गौरवोद्गार चितळे यांनी काढले. चिपळूणमधील रसिकांनी या पाच दिवसीय अभ्यासपूर्ण व सुश्राव्य कीर्तनमालेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे यांच्यासमवेत संगीत संयोजक श्री. कमलेश भडकमकर, श्री स्वामी चैतन्य परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री. सुधाकर बेंडके, उपाध्यक्ष श्री. समीर देवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात बुवांसमवेत असलेले साथीदार श्री. मिलिंद तायवाडे (तबला), श्री. मनोज भांडवलकर (पखवाज), श्री. चिंतामणी निमकर (ऑर्गन), श्री. वज्रांग चारूदत्त आफळे (तालवादक), श्री. वरद केळकर (सहगायक) तसेच ह.भ.प. श्री. संकेतबुवा भोळे यांचा श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने श्री. शेखर जाधव, श्री. देवेंद्र रेडीज व श्री. हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय (नाना) परचुरे यांनी केले. पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणाऱ्या या पाच दिवसीय कीर्तनमालेचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक परिवाराच्या वतीने करण्यात आले.

संबंधित लेख