परांजपे हॉटेल दिनदर्शिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते प्रकाशन
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 281 views
चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण शहरातील ८६ वर्षांची परंपरा असलेल्या परांजपे हॉटेल व परांजपे मसाला यांच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजय भालेकर, परांजपे हॉटेलचे श्रीनिवास परांजपे, शाम परांजपे, धीरज नलावडे, भाजपचे नरेंद्र बेलवलकर, श्री. मोरे यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी जगदीश वाघुदळे, श्रीनिवास परांजपे व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुखदा परांजपे यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे औक्षण केले. त्यानंतर दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन पार पडले. यावेळी बोलताना श्रीनिवास परांजपे यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, “दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधीही निराश केले नाही. असा नगराध्यक्ष चिपळूणला मिळणे हे आपले भाग्य आहे,” अशी भावना व्यक्त केली. त्यांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत, रेड लाईन–ब्ल्यू लाईनचा प्रश्न सुटावा आणि चिपळूण स्मार्ट सिटी व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, असे सांगितले.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “व्यवसायाची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनदर्शिकेसारखे प्रभावी माध्यम नाही. ही संकल्पना अभिनंदनास पात्र आहे.” तसेच श्रीनिवास परांजपे हे लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य करीत असल्याचे नमूद करत, आपल्या विजयात त्यांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. “परांजपे चिवडा व इतर पदार्थांची चव केवळ चिपळूणपुरती मर्यादित नसून सातासमुद्रापार पोहोचली आहे,” अशा शब्दांत त्यांनी परांजपे परिवाराचे विशेष कौतुक केले.
यावेळी अजय भालेकर व श्री. मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला श्रीनिवास परांजपे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
