दापोलीत व्हेल माशाची कोट्यवधींची उलटी जप्त; चार जण अटकेत, त्यात पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश

दापोली : दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने दापोली बसस्थानकाजवळील कारमधून सुमारे ४ किलो ८३३ ग्रॅम व्हेल माशाची उलटी (Ambergris) जप्त केली असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संशयित कारचा पाठलाग करून ती दापोली बसस्थानकामागे थांबवली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये कोट्यवधी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी आढळून आली.

या कारमध्ये उपस्थित चार संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन चौकशीसाठी दापोली कस्टम्स कार्यालयात आणण्यात आले. चौकशीनंतर त्यांची ओळख युवराज मोरे (मुंबई), संजय धोपट (दाभोळ), निलेश साळवी (रत्नागिरी) आणि सिराज शेख (मुंबई) अशी पटली. या चौघांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्यांपैकी संजय धोपट हा दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कारवाईत सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार, निरीक्षक प्रतीक अहलावत, रमणिक सिंग, मुख्य हवालदार सुहास वेलणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौऱ्या आणि हेमंत वासनिक यांनी सहभाग घेतला.

अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला आहे.

संबंधित लेख