डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा; चिपळूणमध्ये कॅण्डल मार्च

 

चिपळूण (प्रतिनिधी) : फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आणि या प्रकरणाचा तपास सीबीआय / सीआयडी / एसआयटी कडे वर्ग करण्यासाठी चिपळूण शहरात कॅण्डल मार्च काढण्यात आला. हा मार्च शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातून ऐक्याने पार पडला.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटना (MAGMO), इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि वूमन्स डॉक्टर्स विंग यांच्या वतीने हा कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला. या माध्यमातून डॉ. संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहत त्यांना न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कॅण्डल मार्चचे अध्यक्षस्थान सिव्हिल सर्जन डॉ. भास्कर जगताप यांनी भूषविले.

मुख्य संयोजक म्हणून आयएमए महाराष्ट्र राज्य समन्वयक व इएजीएमओ प्रतिनिधी डॉ. कांचन मदार उपस्थित होत्या. या वेळी इएजीएमओ रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. अमोल यादव, अधीक्षक कामथे डॉ. असित नरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, महिला डॉक्टर्स विंग चिपळूणच्या चेअरमन डॉ. मनीषा वाघमारे, व्हाईस चेअरमन डॉ. वनिता सानप यांच्यासह डॉ. रूपा मयेकर, डॉ. अभिजित दुधाळ, डॉ. साक्षी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय अभिजीत यादव, सुनील जाणवलकर, रमेश जानवलकर, संदेश म्हटलेकर, स्वप्निल तांबे, तसेच आ.स. समिती चिपळूणच्या अध्यक्षा मोहोड, उपाध्यक्षा अक्षदा पाटणकर, सचिव इकबाल चौगुले, विनोद जाधव, नरेंद्र चव्हाण, डॉ. निकिता शिर्के यांच्यासह आरोग्य कर्मचारी, महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कॅण्डल मार्चदरम्यान, “डॉ. संपदाला न्याय मिळालाच पाहिजे”, “आरोग्य सेविकांचे संरक्षण करा” असे संदेश देत शांततेत निश्चय व्यक्त करण्यात आला.

संबंधित लेख