डीबीजे महाविद्यालयात ‘सडक सुरक्षा – जीवन रक्षा’ विषयावर जनजागृतीपर व्याख्यान
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 43 views
चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस विभागामार्फत “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरटीओ अधिकारी आफरीन मुलानी व मोहसीन आवटी यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना त्यांनी महामार्गावर प्रवास करताना योग्य लेनचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा सक्तीने वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालवणे, स्टंटबाजी टाळणे तसेच दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी न घेणे या महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. तसेच मालवाहू वाहनांतून अनधिकृत प्रवासी वाहतूक करू नये, शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक टाळावी, रस्त्यावरील वाहतूक चिन्हे ओळखावीत आणि ट्रॅफिक सिग्नलचे काटेकोर पालन करावे, यावर विशेष भर देण्यात आला.
“रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून ती राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात डॉ. माधव बापट यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात उपयुक्त ठरतात, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, एनसीसी विभाग प्रमुख मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने, एनएसएस प्रमुख (वरिष्ठ महाविद्यालय) डॉ. डी. टी. कदम, एनएसएस प्रमुख (कनिष्ठ महाविद्यालय) अविनाश पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मेजर नम्रता माने यांनी मानले.
