जुने–नवे सर्व शिवसैनिक एकत्र आले पाहिजेत : माजी आमदार सदानंद चव्हाण
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 115 views
चिपळूण : जुने–नवे सर्व शिवसैनिक एकत्र आले पाहिजेत, असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केले. चिपळूण नगरपरिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, हीच एकजूट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही कायम ठेवून तेथेही भगवा फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. चिपळूण नगर परिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष होणे हे माझे स्वप्न साकार झाल्याची भावना शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून, याच ताकदीच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही मेहनत करून तेथेही भगवा फडकवू, असे त्यांनी सांगितले.
पुष्कर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे तालुकाप्रमुख बापू आयरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार चव्हाण म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जिंकल्या जातात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे आणि त्याला पुढे नेणे हीच माझी भूमिका आहे. जनतेसाठी व सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी नेतृत्व करण्यास मी सदैव तयार आहे.
कोणत्याही पदाची अपेक्षा न करता मी पक्षासाठी काम करत आलो असून पुढेही करत राहीन. कार्यकर्त्यांमुळेच मी घडलो असून, २००५ साली पक्ष मजबूत असल्यामुळेच मी आमदार होऊ शकलो, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत वैयक्तिक लाभ झाला नसला तरी मी कधीही पक्षावर नाराजी ठेवली नाही. मी करत असलेल्या कामावर पक्षाच्या वरिष्ठांचा पूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
