चिपळूण पंचायत समितीत राष्ट्रवादीकडून गटनेतेपदी सूर्यकांत खेतले

चिपळूण : चिपळूण पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत सूर्यकांत खेतले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र सत्ता कोणासोबत स्थापन करायची, याबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम आहे.

पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. पंचायत समितीच्या एकूण १८ जागांपैकी राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ७, शिवसेना – ४, ठाकरे सेना – ४ आणि भाजप – ३ जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी १० सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी सभापतीपदासाठी पाठिंबा देणाऱ्या पक्षासोबत सत्ता स्थापण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीकडून ठाकरे सेनेसोबत सत्ता स्थापनेचा प्रारंभी कल असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यात ठाकरे सेनेला अधिक बळ मिळू नये, यासाठी गुप्त हालचाली सुरू झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पाग हायस्कूल येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सूर्यकांत खेतले यांची पंचायत समितीतील गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. खेतले यांनी यापूर्वी उपसभापती म्हणून काम केले असून, ते पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग लक्षात घेता त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र या बैठकीत गटनेतेपदाव्यतिरिक्त सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

दरम्यान, आमदार शेखर निकम कोणता राजकीय निर्णय घेतात, याकडे चिपळूण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या बैठकीला आमदार शेखर निकम, शौकतभाई मुकादम, जयंद्रथ खताते, दादा साळवी, रमेश राणे, अशोक कदम, पांडुरंग माळी, नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर, नवनिर्वाचित सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, संजय कदम, मेघा इंगावले, स्नेहा साळवी, मनस्वी बैकर, तसेच मयूर खेतले, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
 

संबंधित लेख