चिपळूण नगर परिषदेची पहिली कौन्सिल सभा १२ जानेवारीला
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 80 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून नगराध्यक्षपदी थेट जनतेतून उमेश सकपाळ यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला ९, भाजपला ७, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ५, काँग्रेसला ३ तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत.
नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिलीच कौन्सिल सभा सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. या महत्त्वाच्या सभेत उपनगराध्यक्ष, तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
नगर परिषदेत शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ बहुमतात असल्याने उपनगराध्यक्षपद या दोन्ही पक्षांपैकी एकाकडे जाणार असून, बहुधा भाजपला उपनगराध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, स्वीकृत सदस्यांमध्ये शिवसेनेचा एक, भाजपचा एक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक सदस्य असा समावेश असणार आहे.
शिवसेनेकडून विकी लवेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. भाजपकडून अद्याप कोणाची निवड होणार, याबाबत स्पष्टता नाही. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी नगरसेवक फैसल कासकर व बाळा कदम यांची नावे चर्चेत आहेत.
१२ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या कौन्सिल सभेकडे शहराचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे, कारण याच सभेत नगरपरिषदेतील सत्तेची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
