चिपळुणात प्रशांत यादवांनी फुलवलं कमळ
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 304 views
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण पालिकेच्या पंचवार्षीक सार्वत्रिक निवडणूकीत भाजप नेते प्रशांत यादव यांनी आपला करिश्मा दाखवला. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ विराजमान झाले. युतीने १६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम यांची निराशा झाली. भाजपतर्फे प्रशांत यादव यांनी चिपळूण पालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी स्विकारली होती. या निवडणूकीत ते सरस ठरल्याचे दिसून आले.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाजूला ठेवत शिवसेना आणि भाजपने युती केली. शिवसेनेचे १६ तर भाजपचे ११ उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेला ९ तर भाजपला ७ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपात प्रवेश केलेले उद्योजक प्रशांत यादव यांनी या निवडणूकीत आपला करिश्मा दाखवला. निवडणुकीचे नेतृत्व करताना त्यांनी युतीच्या उमेदवारांसाठी वॉर्ड निहाय सभा घेतल्या. भाजपचे कमळ फार फुलणार नाही, अशी टिका मतमोजणीपुर्वी विरोधकांकडून केली जात होती. मात्र यादव यांनी निकालातून उत्तर दिले आहे. गत निवडणूकीत भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणूकीत भाजपाला ७ पर्यजांत वाढल्या. देवरूखच्या नगराध्यक्षपदी देखील भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाला. शिवसेना शिंदे गटाने या निवडणूकीत वर्चस्व ठेवले. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झाले. सकपाळ यांनी गेल्या दोन वर्षापासून केलेली तयारी अखेर फलदायी ठरली, त्यामुळेच शिंदेसेनेचे ९ नगरसेवक विजयी झाले.
नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार रमेश कदम यांना मात्र पराभवास सामोरे जावे लागले. आमदार शेखर निकम यांचीही या निवडणूकीत निराशा झाली. निकमांचे केवळ २ उमेदवार विजयी झाले. त्याशिवाय आमदार भास्कर जाधव यांच्या उबाठाला देखील मोठा पल्ला गाठता आलेला नाही. उबाठाचे केवळ ५ नगरसेवक विजयी झाले. विजयाचा दावा करणारे अपक्ष उमेदवार लियाकत शाह यांचाही मोठा पराभव झाला. क्रॉंग्रेस ३ उमेदवार विजयी झाले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ २ जागा जिंकत्या आल्या.
