चिंद्रवली–कोंडवी वाकणजवळ मिनी बस दरीत कोसळली; एक कामगार ठार, दहा जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चिंद्रवली–कोंडवी वाकणजवळ बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मोहनेश चंद्रम बडगेर (वय ३२, रा. कर्नाटक) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार वळणावर बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्वजण रस्त्याच्या कामावर असलेले मजूर असून ते सध्या हरचेरी येथे वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी हे कामगार मिनी बसने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पाली येथील बाजारपेठेत गेले होते. खरेदी आटोपून हरचेरीच्या दिशेने परतत असताना चिंद्रवली–कोंडवी येथील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ब्रेक निकामी झाल्याने बस थेट दरीत कोसळली.

या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेला मोहनेश बडगेर हा बसबाहेर फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

बसमधील अन्य दहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित लेख