गणपतीपुळे समुद्रात दुर्दैवी घटना : तिघे बुडाले; दोघांची सुटका, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रात शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी प्रकारात तीन तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह एमटीडीसीजवळील किनाऱ्यावर आढळून आला. तर त्याच्यासोबत बुडालेल्या विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४, दोघेही रा. भिवंडी) यांना समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांनी व जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील सहा मित्रांची ही मंडळी शनिवारी देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आली होती. त्यापैकी तिघेजण सायंकाळी समुद्रात आंघोळीला गेले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. लाटा प्रचंड असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले. त्यांच्या इतर मित्रांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला.

यावेळी मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या जेटस्कीवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत दोघांना पाण्याबाहेर काढले. तातडीची मदत म्हणून दोघांना गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्समधून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र अमोल ठाकरे हा खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. शनिवारी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही तो मिळून आला नव्हता.

रविवारी सकाळी अखेर एमटीडीसीजवळील किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 

संबंधित लेख