खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगणार १४ ऑक्टोबरला

१५२ महिलांचा उत्साह; प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलांना संधी 

चिपळूण : चिपळूण नगरपरिषद, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित केलेल्या “प्लास्टिक मुक्त होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा” या विशेष कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण येत्या मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे.

सप्टेंबर महिन्यात या उपक्रमात एकूण १५२ महिलांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांनी जमा केलेल्या प्लास्टिकच्या प्रमाणानुसार ५०० ग्रॅम प्लास्टिक जमा करणाऱ्या प्रत्येक महिलेला एक कुपन दिला गेला. एकूण ५५८ किलो प्लास्टिक शहरातील विविध भागातून जमा करण्यात आले. विशेष म्हणजे ७ किंवा त्याहून अधिक कुपन जमा करणाऱ्या ५६ महिलांना विशेष गौरव देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट घराघरात प्लास्टिक वापर कमी करणे, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हा आहे. सहभागी सर्व महिलांना खेळ पैठणीचा मध्ये सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार असून, विशेष पुरस्कारास पात्र विजेत्यांसाठी पैठणीचे बक्षीस ठेण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रमुख पुरस्कारांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे : सर्वात जास्त प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलेला पैठणी, नवीन जास्तीत जास्त महिलांना सहभागी करणाऱ्या महिलेला पैठणी, ७ पेक्षा जास्त कुपन धारकांमध्ये लकी ड्रॉ विजेत्याला पैठणी

पारितोषिक वितरण कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. शाहीर शाहीद खेरटकर खेळ पैठणीचा खेळविणार आहेत. 

मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील सर्व नागरिक आणि सहभागी महिलांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विशेषतः म्हटले की, “सर्व सहभागी महिलांच्या प्रयत्नांमुळे शहरात प्लास्टिक मुक्त वातावरण निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवावा.”

या उपक्रमाद्वारे केवळ पर्यावरण संवर्धन नाही, तर महिलांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद निर्माण झाला आहे.
 

संबंधित लेख