आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात
- by Yogesh Bandagale
- January 30, 2026
- 99 views
रत्नागिरी, दि. ३० (जिमाका): रुग्णसेवेत दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ‘कोकण स्पंदन’ या स्नेहसंमेलनाने रत्नागिरीकरांची मने जिंकली. भारतीय प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यांचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, क्षयरोग (टीबी), कुष्ठरोग व हत्तीरोग विभाग, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्टेथोस्कोप बाजूला ठेवून कलाविष्कार
दैनंदिन वैद्यकीय जबाबदाऱ्यांमधून वेळ काढत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोपासलेली कला या मंचावर सादर केली. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर झाले.
शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल मैफिलींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लोकनृत्ये व बॉलीवूड गीतांवरील बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मिमिक्री, सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका व नाटकांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
संघटित प्रयत्नांचे यश
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन सुतार यांच्यासह संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.
आरोग्य सेवेसोबतच कलेच्या क्षेत्रातही आरोग्य विभागाने घेतलेली ही भरारी रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात निश्चितच उल्लेखनीय ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रेक्षकांच्या तुडुंब प्रतिसादाने सावरकर नाट्यगृह अक्षरशः दुमदुमून गेले होते.
