कोकण विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड तसेच नाटक कंपनी, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय वर्ष १ली वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे होणार आहे.

या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांसाठी सहा विविध विषय देण्यात आले असून त्यामध्ये स्वर्गाहून सुंदर, आपलं कोकण, मनोरंजनाचा प्रवास – नाटकापासून चित्रपटापर्यंत, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, आपण आशावादी राहुयात…, युद्ध कुणाला हवे असते? तसेच # ‘ट्रेडिंग’ची दुनिया या विषयांचा समावेश आहे. समाज, संस्कृती, संविधान, कला आणि समकालीन विषयांवर विचार मांडण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.

स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून १० हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, तर तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय तीन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गुणवंत स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, प्रत्येक स्पर्धकास ४+२ म्हणजेच एकूण ६ मिनिटे सादरीकरणासाठी वेळ देण्यात येईल. ही स्पर्धा १५ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. कोणतेही पारितोषिक विभागून दिले जाणार नाही. स्पर्धेसंबंधीचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुदर्शन (९६५७८७२३६४), आदेश (९१३००३८३९६), श्रद्धा (७८८७४५२७३७), मयूर (९८२२११५१०१), अविनाश (८४८३०५१६०५) व गीतेश (९२२६७४३६१०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वक्तृत्वकलेच्या माध्यमातून विचारमंथनाला चालना देणाऱ्या या स्पर्धेत कोकण विभागातील वक्तृत्वप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित लेख