कोकणचा साज, संगमेश्वरी बाज; पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रयोग

मुंबई (प्रतिनिधी): कोकणातील समृद्ध लोकसंस्कृती व संगमेश्वरी बोलीचा गोडवा रसिकांपर्यंत पोहोचवणारे लोकप्रिय लोकनाट्य "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" आता आपल्या ५५० व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या लोकनाट्याचा विशेष प्रयोग शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.३० वा. पार्ल्यातील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर होणार आहे.

आतापर्यंत ५२५ हून अधिक यशस्वी प्रयोग सादर केलेल्या या लोकनाट्याने मुंबईसह कोकणात रसिकांची दाद मिळवली आहे. संगमेश्वरी बोलीचा गोडवा, जाकडी, नमन, भजन यांसारख्या लोककलेचे रंग आणि ग्रामीण जीवनाचे विनोदी तसेच प्रबोधनात्मक चित्रण ही या नाटकाची वैशिष्ट्ये ठरली आहेत.

‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’चे प्रमुख पात्र तात्या गावकर याच्या माध्यमातून गावची संस्कृती, परंपरा, कला आणि बदलत्या जीवनशैलीतील संघर्ष रसिकांपुढे प्रभावीपणे मांडले जातात. मुंबईतून आलेला एक तरुण गावातील इरसाल मंडळींच्या संगतीत कोकण अनुभवतो, आणि त्यातून विनोदाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या चिंता, समस्या व संस्कृतीविषयीचे प्रेम अधोरेखित केले जाते.

या लोकनाट्याला मुलुंड येथील ९८ व्या मराठी नाट्यसंमेलनात विशेष व्यासपीठ मिळाले होते. त्यानंतर कोकण व मुंबईत झालेल्या प्रयोगांना सतत हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभत आहे.

कलाकार सुनील बेंडखळे यांनी या लोकनाट्याच्या माध्यमातून बोलीभाषा टिकवणे, नव्या पिढीकडे हस्तांतरित करणे आणि भाषा बोलण्याचा संकोच दूर करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.

हा प्रयोग अर्चना थिएटर्स निर्मित, श्री पाणबुडी देवी कलामंच (मुंबई) प्रस्तुत असून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. दिपक धोंडू कारकर यांच्या आयोजनाखाली सादर होत आहे.

रसिकांनी कुटुंबासह या धम्माल व दर्जेदार प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
 

संबंधित लेख