किरदाडी–आंबव–सांगावे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 56 views
संगमेश्वर : मौजे किरदाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील पाटगाव घाटी ते किरदाडी–आंबव–कोंडकदमराव–सांगावे या किमी ०/० ते ६/२०० लांबीच्या अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असून दैनंदिन वाहतूक, शेती, शिक्षण व आरोग्य सेवेसाठी महत्त्वाचा दुवा आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामास सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सदर रस्ता PMJ हेड अंतर्गत मंजूर झाला असून, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने यांच्या कार्यकाळात तो प्रस्तावित करण्यात आला होता. माजी खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तसेच आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला. भूमिपूजनामुळे नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळाले आहे.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले,
“हा रस्ता केवळ बांधून पूर्ण करणे हे उद्दिष्ट नसून, तो दर्जेदार, टिकाऊ व लोकांच्या दीर्घकाळ उपयोगाचा व्हावा यावर माझा विशेष भर राहील.”
तसेच त्यांनी माजी मंत्री रवींद्रजी माने व माजी आमदार सुभाषजी बने यांच्या कार्यकाळातील नियोजनबद्ध विकासकामांचा उल्लेख करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
“प्रत्येक गावाचा समतोल विकास हेच माझे ध्येय आहे. उर्वरित विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. यासाठी पक्षभेद न ठेवता केवळ जनहिताचा विचार केला जाईल,” असा विश्वास आमदार निकम यांनी ग्रामस्थांना दिला. त्यांच्या या शब्दांनी उपस्थित नागरिकांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून रस्त्याच्या कामाबाबत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी रोहनजी बने, नेहा माने, माधवी अधटराव, सुभोध पेडणेकर, प्रद्युम्ण माने, बाळा माने, बबन बोथले, रुपेश माने, दुर्वा शेलार, विश्वास शेलार, प्रज्ञा पेडणेकर, रवी पेडणेकर, विलास चव्हाण, प्रवीण पेडणेकर, सचिन जाधव, नाना सावंत, गमरे यांच्यासह आंबव–किरदाडी–सांगावे ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
