कपिल विठ्ठल शिर्के यांची दणदणीत कामगिरी चर्चेत
- by Yogesh Bandagale
- December 23, 2025
- 320 views
चिपळूण (योगेश बांडागळे) : चिपळूण नगर पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले असून, त्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो प्रभाग क्रमांक १०मधील तरुण नगरसेवक विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के यांच्या विक्रमी मताधिक्याचा. संपूर्ण शहरातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक ६३९ मतांच्या फरकाने त्यांनी मिळवलेला विजय विशेष ठरत आहे.
कपिल शिर्के यांनी शिवसेना–भाजप युतीकडून प्रभाग क्रमांक १०मधून निवडणूक लढवली होती. ही त्यांची चिपळूण नगर परिषदेतील दुसरी निवडणूक होती. मागील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही त्यांनी खचून न जाता सातत्याने जनसंपर्क ठेवला आणि त्याच मेहनतीचे फळ या निवडणुकीत मिळाले.
या निवडणुकीत कपिल शिर्के यांना ८९२ मते मिळाली. त्यांच्या विरोधात असलेले अजय कांबळे यांना २५३ मते, अजित शंकर शिंदे यांना अवघी २३ मते, तर NOTA ला २९ मते मिळाली. या निकालातून मतदारांनी कपिल शिर्के यांच्यावर दाखवलेला प्रचंड विश्वास स्पष्टपणे दिसून आला आहे.
तरुण, अभ्यासू आणि काम करणारा नेता
व्यवसायाने इंजिनिअर असलेले कपिल शिर्के हे तरुण, तडफदार आणि अभ्यासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या अडीअडचणी तात्काळ सोडवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. शिवसेना पक्षात कार्यरत असताना त्यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
आपत्ती काळातील उल्लेखनीय योगदान
२०२१च्या महापुरात चिपळूण शहर जलमय झाले असताना कपिल शिर्के यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पूरग्रस्तांना मदत, स्वच्छता, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच नारायण तलाव परिसरात पाणपोळीची उभारणी, तलावाच्या दुरुस्तीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
विकासकामांवर लक्ष
स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल या रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. नगरसेवक म्हणून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
उत्तम प्रचार नियोजनाचे यश
निवडणूक प्रचारादरम्यान कपिल शिर्के यांनी उत्कृष्ट नियोजन केले. तरुणांची मोठी टीम, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि पत्नीचा सक्रिय सहभाग यामुळे प्रचार अधिक प्रभावी ठरला. सहउमेदवार रसिका देवळेकर यांच्याशी समन्वय साधत त्यांनी प्रचार यंत्रणा यशस्वीपणे राबवली.
या दणदणीत विजयामुळे शहरभरातून कपिल शिर्के यांचे विशेष कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तरुण वयात मिळवलेले हे यश आणि मतदारांचा मिळवलेला विश्वास भविष्यातील सक्षम नेतृत्वाची नांदी ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
