एलईडी टीव्हीद्वारे उपक्रमांची माहिती!
- by Yogesh Bandagale
- October 10, 2025
- 185 views
चिपळूण पालिकेचा उपक्रम, कार्यालयात येणाऱ्यांना पाहता येतेय माहिती
चिपळूण : नागरिकांना नगर परिषद राबवत असलेल्या उपक्रमांची आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी चिपळूण नगर परिषदेत एलईडी टीव्ही बसवण्यात आला आहे. या टीव्हीवर नगर परिषदेच्या योजना, चालू प्रकल्प आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती दाखवली जात असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
भोसले म्हणाले, “विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक नगर परिषदेत येतात. अनेकदा मला भेटण्यासाठी त्यांना थांबावे लागते. अशा वेळेत त्यांना नगर परिषद राबवत असलेले उपक्रम आणि योजना समजाव्यात, तसेच त्यातून ते स्वतःसाठी व शहरासाठी काय करू शकतात, याचा विचार करावा, या उद्देशाने दालनाबाहेर हा एलईडी टीव्ही बसवण्यात आला आहे.”
सध्या या स्क्रीनवर नगर परिषदेचे उपक्रम, कामांची छायाचित्रे आणि माहिती दाखवली जात असून, लवकरच नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व मार्गदर्शन देखील प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण नगर परिषदेमार्फत शहरात करण्यात आलेली विविध विकासकामे आणि उपक्रम आता स्लाईड शोद्वारे नागरिकांना पाहता येणार आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण, नारायण तलावाचे सुशोभीकरण, अश्वारूढ पुतळा, शहरातील १२ ठिकाणी उभारलेली ओपन जिम्स, उद्यानांची देखभाल आणि मैदानांची कामे यांचा समावेश आहे.
याशिवाय नगर परिषदेमार्फत राबवले जाणारे ‘वाचू आनंदाने’, ‘सायकल डे’, तसेच ‘रत्नक्षारे’ आणि ‘वैभवशाली चिपळूण’ ही प्रकाशने, स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही स्क्रीनवर दाखवली जात आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना नगर परिषदेच्या योजनांबाबत जागरूकता मिळेल आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रतीक्षेत असताना माहितीपूर्ण वेळ घालवता येईल, असा हेतू प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेला कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, तसेच सचिन शिंदे, संतोष शिंदे, वलीद वांगडे, सुशांत मोहिते आदी अधिकारी उपस्थित होते.
