अवधूत गुप्तेंच्या लाईव्ह शोने तरुणाई थिरकली
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 111 views
‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ने भारावले मन
चिपळूण : वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सव दिवसेंदिवस अधिकच बहरत चालला असून कृषी स्टॉल्स, पशुधन प्रदर्शन, पाककला स्पर्धा यांसह सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी चिपळूणकरांनी मनसोक्त अनुभवली. महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेला ‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ हा कार्यक्रम इतिहास, शौर्य आणि स्वाभिमानाचा जिवंत जागर ठरला; तर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या लाईव्ह संगीत मैफिलीने तरुणाईला अक्षरशः डुलायला लावले.
मँगोज इव्हेंट्स आयोजित अवधूत गुप्ते यांच्या कार्यक्रमात ईशानी पाटणकर, विकास धुरी आणि अनुष्का शिकतोडे यांच्या सादरीकरणाने रंगत वाढवली. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज आणि ‘वन्स मोअर’च्या आग्रहाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. शुक्रवारी अशोक हांडे प्रस्तुत ‘मै आवारा हूँ’ या सांस्कृतिक कार्यक्रमालाही कलारसिकांनी भरभरून दाद दिली.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून ५ ते ९ जानेवारीदरम्यान वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाही कोकणवासीयांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृषी स्टॉल्स, पशुधन, पाककला स्पर्धा, जुन्या पद्धतीची घरे आणि फळबाग लागवडीचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
महोत्सवाच्या चारही रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांनी चिपळूणवासीयांचे भरभरून मनोरंजन केले. त्याचबरोबर हरिपाठ, कीर्तन, भजन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. ६ जानेवारी रोजी झालेल्या ‘वारी सोहळा संतांचा’ या कार्यक्रमात विठ्ठल नामाच्या जयघोषाने उपस्थित भावविभोर झाले. ७ जानेवारी रोजी सादर झालेल्या ‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ या कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. ढोल-ताशांचा गजर, मर्दानी शस्त्रकला, स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची मिरवणूक आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद यामुळे परिसर इतिहासाचा साक्षीदार बनल्याचे चित्र होते.
तरुणाईची धम्माल, कलारसिकांची भरघोस दाद
गुरुवार, ९ जानेवारी रोजी झालेल्या अवधूत गुप्ते – लाईव्ह परफॉर्मन्स कार्यक्रमाची सुरुवात गायक विकास धुरी यांच्या गणरायांच्या गीताने झाली. त्यानंतर ‘मेरी मधुबाला’, ‘जेवला का पाहुणा’, ‘सखे ग साजणी’, ‘माझी आजी म्हणायची ओवी’, ‘भीम बनला सावली’, ‘काय सांगू हिला गाव सुटना’, ‘कांदे पोहे’, ‘ढगाला लागली कळ’ यांसारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गीतांवर प्रेक्षक थिरकले. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच प्रेक्षकांनी रंगमंचासमोर उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गीतांतून महाराष्ट्राचा आत्मा
अवधूत गुप्ते यांच्या गीतांनी शेती, माती, नाती, संघर्ष आणि स्वप्नांचे भावविश्व उलगडले. त्यांच्या प्रत्येक गीतातून ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आणि मराठी माणसाची भावना प्रकर्षाने जाणवत होती. लाईव्ह बँड, प्रकाशयोजना, रंगमंचावरील ऊर्जा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम इतका रंगला की शेवटच्या गाण्यापर्यंत कलारसिकांनी आपली खुर्ची सोडली नाही.
कार्यक्रमाच्या शेवटी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्या हस्ते गायक अवधूत गुप्ते व इतर कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कृषी महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांना चिपळूणवासीयांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल प्रशांत यादव यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
