अपरान्तमध्ये नवसंजीवनी देणारी शस्त्रक्रिया : डॉ. सद्गुरु पाटणकर यांच्या कुशल उपचाराने रुग्णाला नवे जीवन
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 135 views
चिपळूण : अत्याधुनिक सुविधा आणि डॉ. सद्गुरु पाटणकर यांचा प्रदीर्घ अनुभव यांच्या जोरावर अपरांत हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाने पुन्हा एकदा रुग्णाला नवसंजीवनी दिली आहे. सात वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातानंतर अत्यंत क्लिष्ट अवस्थेत असलेल्या 35 वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला पुन्हा चालता-बोलता जीवन मिळवून देण्यात आले.
झाडावरून पडल्याने रुग्णाच्या अंडकोष व मूत्रमार्गाला (Perineal Region) गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याच्या मूत्रमार्गात सुप्राप्युबिक कॅथेटर बसवण्यात आला होता. ही नळी सात वर्षांपासून कायम राहिल्याने रुग्णाच्या मूत्राशयात मुतखड्यांची माळ तयार झाली होती, तसेच तीव्र जंतुसंसर्ग व Cystitis ची लागण झाल्याचे निदान झाले. दीर्घकाळ राहिलेल्या कॅथेटरमुळे फायब्रोसिस, मूत्रगळती (Perforation) यांसारखे गुंतागुंतीचे धोके निर्माण झाले होते.
रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. लघवीदरम्यान रक्तस्त्राव, असह्य वेदना, दुर्गंध, सतत ताप अशी लक्षणे दिसू लागली होती. परिणामी तो काम करण्यास असमर्थ झाला आणि चार वर्षे पूर्णतः खाटेवरच होता. पत्नीवर सर्व जबाबदारी येऊन पडली होती.
या कठीण परिस्थितीत एका नामांकित डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्ण अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. डॉ. सद्गुरु पाटणकर यांनी सखोल तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने ब्लेडर म्युकोसाला कोणतीही इजा न करता सुप्राप्युबिक कॅथेटर आणि स्टोन काढून टाकले.
ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर केवळ काही दिवसांत रुग्ण पूर्णपणे सावरला. हॉस्पिटलकडून फॉलोअप कॉल दरम्यान रुग्णाने सांगितले, “सर, आता बरं वाटतंय. थोडं काम शोधतोय, सगळं पुन्हा सुरळीत होईल.”
एका अपघाताने उद्ध्वस्त झालेले कुटुंब पुन्हा हसरे झाले. त्यांच्या आयुष्यात नवसंजीवनी घेऊन आले डॉ. सद्गुरु पाटणकर आणि अपरांत हॉस्पिटलच्या टीमने.
