अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून विमान अपघात तपास ब्यूरो (AAIB) या संस्थेकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेत केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईहून बारामतीकडे येणारे अजित पवार यांचे विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता, तसेच अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत होती.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी सांगितले की, AAIB ने अपघाताचा तपास अधिकृतपणे सुरू केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, विमान अपघात आणि घटना नियमांनुसार संपूर्ण तपास पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने केला जाईल.

ते पुढे म्हणाले की, या तपासात विमानाशी संबंधित सर्व तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल तपशील आणि घटनास्थळावरील तथ्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

या चौकशीचा सविस्तर अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो महाराष्ट्र सरकारलाही सादर करण्यात येणार असल्याची माहिती नायडू यांनी दिली. या तपासात राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 

संबंधित लेख