विधानभवनात शिंदे–ठाकरे आमनेसामने
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 46 views
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील विधानभवनात एक वेगळाच राजकीय क्षण पाहायला मिळाला. सत्ताधारी गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि विरोधी गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे गर्दीतून जात असताना अचानक आमनेसामने आले. त्या वेळी सभागृह परिसरात मोठी गर्दी असल्याने दोघांचे खांदे एकमेकांना लागतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी दोघेही थोडे बाजूला सरकल्याने संभाव्य धडक टळली.
दरम्यान, मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे वरिष्ठ सभागृहात (विधानपरिषद) उपस्थित होते. अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ठाकरे सभागृहाबाहेर आले.
त्याच वेळी देवेंद्र फडणवीस तेथून जात असताना ठाकरे यांनी त्यांना नमस्कार करत काही वेळ संवाद साधला. त्यानंतर ते निघाले असताना समोरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत होते. दोन्ही नेत्यांसोबत त्यांचे सहकारी आणि कर्मचारीही होते. गर्दीमुळे दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले; मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बाजूला सरकत पुढे मार्गक्रमण केले.
यापूर्वी फोटो सेशनवेळीही आले होते समोरासमोर
यापूर्वी विधानभवनातील एका फोटो सेशनदरम्यानही ठाकरे आणि शिंदे समोरासमोर आले होते. त्यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपलेल्या अंबादास दानवे यांच्या निरोपावेळी आयोजित कार्यक्रमात ठाकरे यांची खुर्ची शिंदे यांच्या शेजारी ठेवण्यात आली होती. मात्र ठाकरे यांनी त्यांच्या शेजारी बसणे टाळत उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मध्यभागी बसण्याची विनंती केली होती.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विधानभवनात घडलेल्या या प्रसंगानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेते समोरासमोर आले तरी त्यांनी एकमेकांकडे पाहिले नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ही बाब अनेकांच्या नजरेत भरली. शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांमधील वाढलेला दुरावा या प्रसंगातून पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, विधानभवनातील हा प्रसंग पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गर्दीतून दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारून जातानाचा क्षण पाहून अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला केवळ राजकीय योगायोग म्हटले आहे, तर काहींनी हा प्रसंग राज्याच्या सध्याच्या राजकीय समीकरणांचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
