मविआला नव्या भिडूची गरज नाही:राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध
- by Yogesh Bandagale
- October 07, 2025
- 38 views
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली आहे, त्याचवेळी महाविकास आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “इंडिया आघाडीच्या वाटाघाटी स्थानिक पातळीवर होणार आहेत. विद्यमान महाविकास आघाडी पुरेशी मजबूत आहे, त्यामुळे नवीन मित्रपक्ष घेण्याची गरज नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही.”
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही नेते एकत्र आले होते आणि मागील काही महिन्यांत चार ते पाच वेळा भेटीही झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “राज-उद्धव ठाकरेंची युती ‘दिल-दिमाग’वर आधारित आहे,” ज्यामुळे या युतीची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
मनसेकडून काँग्रेसच्या विधानावर प्रत्युत्तर देताना अविनाश अभ्यंकर म्हणाले, “युतीसाठी आम्ही कुठे गेलेलो नाही. आमच्या पक्षात निर्णय घेण्याचे अधिकार फक्त राज ठाकरे यांनाच आहेत. सध्या माध्यमांत चाललेली चर्चा कौटुंबिक स्वरूपाची आहे; राज ठाकरे जे आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू.”
उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर म्हणाले की, “स्थानिक पातळीवर मनसेसोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस स्वतंत्र विचारधारेचा पक्ष असल्यामुळे त्यांची भूमिका काही भागांमध्ये वेगळी असू शकते, पण अंतिम निर्णय चर्चेनंतरच होईल.”
