पश्चिम घाटात तेजस ठाकरे यांचा नवा शोध — केसाळ गोगलगायींची नवीन प्रजाती ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 58 views
मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या अभ्यासात आणखी एक मोलाची भर पडली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे आणि त्यांच्या संशोधन पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी परिसरातील निमसदाहरित जंगलात केसाळ गोगलगायींच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे सूक्ष्म प्रजातींच्या जैवविविधतेविषयी नव्या संशोधनाला दिशा मिळणार आहे.
या गोगलगायीच्या प्रजातीचे शास्त्रीय नामकरण प्रसिद्ध जपानी अॅनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या सन्मानार्थ ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे करण्यात आले आहे. मियाझाकी यांच्या चित्रपटांत निसर्गाशी असलेले नाते आणि पर्यावरणीय संतुलनाचे तत्त्व सुंदरपणे मांडले जाते. त्याच विचारांना सलाम म्हणून हे नामकरण करण्यात आले असल्याचे तेजस ठाकरे यांनी सांगितले.
या संशोधनाचा सविस्तर अहवाल ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या गोगलगायीच्या प्रजातीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिच्या शरीरावर असलेले सूक्ष्म केस आणि स्थानिक परिसंस्थेतली तिची पर्यावरणीय भूमिका. अन्नसाखळीत गोगलगायींसारख्या लहान प्रजातींचे स्थान महत्त्वाचे असते, मात्र संशोधन क्षेत्रात त्या प्रजाती दुर्लक्षित राहिलेल्या आहेत.
तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही पश्चिम घाटात अनेक दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचा शोध लावला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या टीमने ‘सह्याद्रीओफिस उत्तरघाटी’ या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला होता. या नावात संस्कृत शब्द ‘सह्याद्री’ आणि ग्रीक शब्द ‘ओफिस’ (साप) यांचा संयोग करण्यात आला होता.
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून पुढील काळात लहान व सूक्ष्म प्रजातींवरील संशोधन अधिक व्यापक प्रमाणात करण्याचा मानस असल्याचे तेजस ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या या नव्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचा खजिना आणखी समृद्ध झाला आहे.
