धारावीतील दोन प्रभागांची जबाबदारी सदानंद चव्हाण यांच्याकडे
- by Yogesh Bandagale
- January 08, 2026
- 485 views
चिपळूण : राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते व चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धारावीतील प्रभाग क्रमांक १८७ आणि १८८ या दोन प्रभागांसाठी पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीसह शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची महाविकास आघाडी रिंगणात आहे. काँग्रेसने मात्र स्वतंत्र लढत दिली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
प्रचाराच्या या धामधुमीत ना. एकनाथ शिंदे यांनी सदानंद चव्हाण यांच्या संघटनात्मक अनुभवावर विश्वास टाकत धारावीतील प्रभाग क्रमांक १८७ व १८८ ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. या भागात शिवसेना (उबाठा) चे खासदार अनिल देसाई, तर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या आमदार आहेत.
नुकत्याच झालेल्या चिपळूण नगर परिषद निवडणुकीत सदानंद चव्हाण यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली तब्बल १६ जागा जिंकून युतीचा भगवा फडकवला होता. त्यांच्या या यशस्वी कामगिरीची दखल घेत ना. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत विश्वासाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी समाविष्ट असलेल्या धारावी मतदारसंघात सदानंद चव्हाण शिवसेनेला निश्चितच यश मिळवून देतील, असा विश्वास चिपळूणमधील शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
