टीम इंडियाच्या खेळाडूंना नडले, भारताने पाकिस्तानला लोळवले
- by Yogesh Bandagale
- September 22, 2025
- 159 views
नवी दिल्ली: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल (21 सप्टेंबर) सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अभिषेक शर्माने धू धू धुतलं.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 105 धावांची भागिदारी झाली. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक सुरुवात केली. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या सगळ्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. दरम्यान पाकिस्तानच्या या कामगिरीवर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर एका टीव्ही शोमध्ये शोएब अख्तरने पाकिस्तान संघावर जोरदार हल्लाबोल केला. शोएब अख्तर म्हणाला की, जर फहीमकडून गोलंदाजी करायची होती, तर मग नवीन चेंडू असताना त्याला गोलंदाजी द्यायची होती. सईम अयुबच्या जागी फहीमला गोलंदाजी देता आली असती. तुमचा मुख्य गोलंदाज अबरारच्या आधी पार्टटाइम गोलंदाज सईम अयुबला गोलंदाजी दिली जातेय. तुमची गोलंदाजी सक्षम नव्हती. पाकिस्तानने 200 धावा केल्या असत्या, तरी पाकिस्तानचे गोलंदाज बचाव करु शकले नसते. भारताने 200 धावाही पार केल्या असत्या, असं शोएब अख्तर म्हणाला. हारिस रौफने भारताविरुद्ध एकाही फलंदाजाला बाद केले नाही. भारतीय फलंदाज त्यांच्याच चुकांमुळे बाद झाले. सूर्यकुमार यादवने चुकीचा शॉट खेळला आणि पाकिस्तानला विकेट मिळाली, अन्यथा सामना इतका पुढे गेला नसता, असं मतही शोएब अख्तरने व्यक्त केलं.
