12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
- by Yogesh Bandagale
- February 12, 2026
- 64 views
नाशिक : राज्यात १० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेला पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर अधिकारी आणि पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
‘कॉपीमुक्त’ अभियानाला धक्का
राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष अभियान राबविले आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बस व्यवस्था आदींबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही काही ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार सिद्ध होतील, त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल. यापुढे अशा शाळांना परीक्षा केंद्र म्हणून परवानगी दिली जाणार नाही. कॉपी करणारे विद्यार्थी, केंद्रप्रमुख, संबंधित पर्यवेक्षक आणि गरज भासल्यास पालकांवरही कारवाई केली जाईल,” असा इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिला.
विविध विभागांचा सहभाग
कॉपीमुक्त परीक्षा अभियानात शिक्षण विभागासोबत महसूल, गृह व ग्रामविकास विभागांचे सहकार्य घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्तरावरूनही विद्यार्थ्यांना निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र ज्या ठिकाणी गैरप्रकार घडले आहेत, तिथे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील प्रकारांमुळे खळबळ
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कॉपीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात इंग्रजी पेपरदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने तपास पूर्ण केला आहे.
१९ जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित
या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह १९ जणांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई सुचविण्यात आली आहे. तसेच इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक आणि कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंत्रणा अधिक कडक करण्याची मागणी पुढे येत आहे.
