ताम्हिणी घाटात दरड कोसळली, कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला, जागेवरच प्राण सोडले
- by Yogesh Bandagale
- October 30, 2025
- 274 views
रायगड (प्रतिनिधी) : ताम्हिणी घाटातून प्रवास करत असताना एका चालत्या कारवर दगड पडून कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. मृत महिला स्नेहल गुजराथी (वय 43) असून त्या पुण्यावरून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या.
ही घटना ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून माणगावकडे एक गुजराती कुटुंब आपल्या अलिशान कारने जात असताना अचानक डोंगरावरून मोठा दगड खाली आला. हा दगड थेट कारच्या सनरुफवर आदळला. दगडाचा वेग एवढा जबरदस्त होता की सनरुफ फोडून तो कारच्या आत शिरला आणि स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यात जोरात आदळला.
यामध्ये स्नेहल गुजराथी गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना जवळच्या मोदी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ताम्हिणी घाटात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून डोंगरकडेचा मुरुम व दगड सैल झाल्याने दरडीचा धोका वाढला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
