सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय विकास गायकवाड शिवसेनेत
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 48 views
रायगड | प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात महायुतीतील दोन प्रमुख घटकपक्ष — शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) — यांच्यातील संघर्ष चिघळू लागला आहे. पालकमंत्री पदाच्या वादातून सुरू झालेली कुरघोडी आता थेट जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमनेसामनेच्या लढाईत रूपांतर झाल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
गायकवाड यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव विभागात तटकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळख असलेले गायकवाड यांनीच आता शिंदे गटाचा झेंडा हाती घेतल्याने तटकरे यांच्या संघटनात्मक बळाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
प्रवेश सोहळ्यात बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले,“राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास जिल्ह्याचं चित्रच बदलू शकतं.”
त्यांच्या या सूचक वक्तव्यातून पुढील रणनीतीबाबत अनेक संकेत मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, महायुतीत असूनही शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. दोन्ही गटांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतच महाभारत पेटण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
राजकीय वर्तुळात सध्या “तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष” हीच चर्चा रंगत असून, हा संघर्ष आगामी निवडणुकांचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
फक्त रायगड नव्हे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन माजी आमदार भाजपात प्रवेश करत आहेत, तर पुण्यात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर थेट आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे.
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी निवडणुकांपूर्वी अनेक ठिकाणी सत्तासंघर्षाचे नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
