महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा विक्रम; भारताविरुद्ध पहिल्यांदाच ४०० धावांचा टप्पा
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 84 views
नवी दिल्ली : महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताविरुद्ध तब्बल ४१२ धावा ठोकत विक्रम रचला. शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ४७.५ षटकांत सर्वबाद होत ४१२ धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही केवळ सातवी वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने वादळी खेळी करत फक्त ५७ चेंडूत शतक झळकावले. महिला एकदिवसीय सामन्यांमधील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. तिने अखेरपर्यंत ७५ चेंडूत १३८ धावांची शानदार खेळी केली. जॉर्जिया वोल (८१ धावा, १४ चौकार) आणि एलिस पेरी (६८ धावा, ७ चौकार, २ षटकार) यांनी अर्धशतके ठोकून संघाला भक्कम आधार दिला. कर्णधार एलिसा हीलीने १८ चेंडूत ३० धावा करून जोरदार सुरुवात दिली होती.
ऑस्ट्रेलियाच्या डावात अॅशले गार्डनरने २४ चेंडूत ३९ धावा, तर ताहलिया मॅकग्राने १४ धावा केल्या. संघाने ४५ व्या षटकापर्यंत ६ बाद ३७९ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. मात्र शेवटच्या चार विकेट्स ३३ धावांत गमावल्या.
भारताकडून अरुंधती रेड्डीने ८६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा व रेणुका ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स, तर क्रांती गौर आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. राधा यादवने ४ षटकांत ४८ धावा दिल्या पण तिला एकही विकेट मिळाली नाही.
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने ८ डिसेंबर २०२४ रोजी ब्रिस्बेनमध्ये ३७१ धावा करून भारताविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या नोंदवली होती. परंतु या विक्रमी डावाने त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.
