बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार: हर्षवर्धन सपकाळ
- by Yogesh Bandagale
- April 09, 2026
- 43 views
मुंबई : बारामती पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अखेर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. “आज दोन पावले मागे आलो असलो तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या समंजस राजकीय परंपरेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींसह सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेत्यांनीही संपर्क साधला होता.
याशिवाय, रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही विनंती केली होती, तर शरद पवार यांनीही भावना व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गांधी भवन येथे भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली होती.
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, उमेदवारी मागे घेतली असली तरी दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. तसेच भारतीय जनता पक्ष सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आघाडीला काँग्रेसचा विरोध कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. मात्र, त्या फोनचा आणि उमेदवारी माघारीचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस उमेदवार अॅड. आकाश मोरे आणि इतर इच्छुकांशी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.
