परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक ६जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला
- by Yogesh Bandagale
- October 20, 2025
- 220 views
परभणी :परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात 14 ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. झाडाखाली बसून गप्पा मारत असलेल्या एका तरुणीवर सहा जणांनी एकत्रितपणे अत्याचार केला असून या अमानुष कृत्याचा व्हिडिओदेखील आरोपींनी चित्रित केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र 14 ऑक्टोबर रोजी दुपारी भोगाव देवी मंदिराच्या मागील जंगल परिसरात झाडाखाली बसून गप्पा मारत होते. त्यावेळी करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन असे सहा जण अचानक त्या ठिकाणी आले. अर्जुन आणि लखन यांनी तरुणाला पकडून ठेवले, तर करण, शेषेराव आणि साबेर यांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
या घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलिसांनी त्वरीत पथके तयार करून कारवाई सुरू केली. पीडितेला विश्वासात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व सहा आरोपींना अल्पावधीत अटक करण्यात आली आहे.
कायदे व कलमे लागू
या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता (IPC) कलम 376(1), 126(1), 310 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अर्जुन दत्तराव बटकुले, शेख साबेर शेख सत्तार, शेषराव दत्तराव शेवाळे यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या मते, आरोपींनी अत्याचार केल्यानंतर पीडितेकडून पाच हजार रुपये देखील बळजबरीने घेतले. घटनेनंतर मुलगी भीतीमुळे मौन बाळगत होती, मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळताच तातडीने चौकशी करून सहाही आरोपींना पकडण्यात आले.
तपासासाठी आठ विशेष पथके
सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन विनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी आठ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. घटनेचा व्हिडिओ, मोबाईल फोन आणि घटनास्थळी मिळालेले पुरावे यांचे सखोल परीक्षण सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवला आहे.
