'दशावतार' सिनेमाची कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची: उद्धव ठाकरे
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 89 views
मुंबई : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. मुळचा कोकणातील कथानक असलेला हा चित्रपट सध्या सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या आठवड्यात या सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला, ज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. सिनेमानंतर उद्धव ठाकरेंनी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या दिलीप प्रभावळकर आणि संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "एका शब्दांत सांगायचं तर, अफलातून पिक्चर आहे, अप्रतिम आहे. बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला, ज्यात सर्व गोष्टी परिपूर्ण आहेत. पहिल्या क्षणापासून कथानक पकडते आणि शेवटपर्यंत त्या पकडीतून काही सुटत नाही."
दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही या वयात जर असं काम करू शकता, तर आणखी पुढे काय कराल? संपूर्ण टीमनं कुठेच काही कमी ठेवलेलं नाही. त्यामुळे हा खरा अर्थाने परिपूर्ण चित्रपट आहे."
‘दशावतार’ या चित्रपटाच्या कथानकाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आपण कुठे आहोत आणि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच लक्षात घेतलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवणारा हा चित्रपट आहे."
सिनेमाच्या विशेष शोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीय आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, तसेच शिवसेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, अभिनेता-कलाकार मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी, छाया कदम उपस्थित होते.
सिनेमाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून, मराठी चित्रपटसृष्टीला एक उत्कृष्ट कामगिरी दिल्याचे अनेक रसिक आणि नेते यांनी मान्य केले आहे.
