घरात अन् महाराष्ट्रात मराठीतच बोला:अजित पवार
- by Yogesh Bandagale
- October 27, 2025
- 29 views
वाई (सातारा) : आपल्या मायमराठीचा अभिमान आणि स्वाभिमान जपण्यासाठी प्रत्येकाने घरात तसेच महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोलावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हिंदी आणि इंग्रजी भाषा आवश्यक आहेत, परंतु मराठी ही मातृभाषा असल्याने ती उत्तमपणे बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे, असे ते म्हणाले.
अजित पवार सोमवारी वाई तालुक्यातील एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाचे पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी नव्याने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण कार्यक्रमात त्यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला.
ते म्हणाले, “सध्या बहुतेकांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्यात काही गैर नाही. पण घरात मराठीत बोलण्यावर भर दिला पाहिजे. अन्यथा १०-२० पिढ्यांनंतर मराठी होती अशी वेळ येऊ नये. समोरचा हिंदीत बोलत असेल, तरी आपण मराठीतच बोलायचे. त्यामुळे तोही मराठी बोलण्यास प्रवृत्त होतो.”
इंग्रजी जगभर फिरण्यासाठी आवश्यक असून हिंदी अनेक राज्यांत वापरली जाते, पण मराठी ही आपल्या अस्मितेची भाषा असल्यावर त्यांनी भर दिला. “मराठी व्यवस्थित आली, तर हिंदी शिकणे कठीण नाही,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पवार यांनी शिक्षणातील मातृभाषेचे महत्त्वही अधोरेखित केले. “पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतच असावे. पाचवीपासून हिंदी शिकता येईल,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. राज्य सरकारच्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.
