अभिनेत्री वर्षा उसगावकरांसह पाच अभिनेत्रींची ४७ लाखांची फसवणूक

मुंबई : ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह पाच अभिनेत्री गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांच्या फसवणुकीला बळी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चित्रपट निर्माता आणि बिल्डर अविनाश जाधव यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपानुसार, जाधव यांनी या अभिनेत्रींकडून एकूण ४७ लाख रुपये घेत फसवणूक केली आहे.

या प्रकरणातील पीडितांमध्ये मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री मृणालिनी सुभाष जांभळे यांचाही समावेश आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नफ्याचे आमिष दाखवून पैसे उकळले

तक्रारीनुसार, आरोपी अविनाश जाधव या अभिनेत्रींना बऱ्याच काळापासून ओळखत होता. त्याने स्वतःला मोठा बिल्डर आणि चित्रपट निर्माता असल्याचे सांगत डोंबिवली येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. तसेच एका वर्षात संपूर्ण मूळ रक्कम परत देण्याचे आश्वासनही दिले.

नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे आणि इतर तिघींनी मिळून धनादेश आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे आरोपीला एकूण ४७ लाख रुपये दिले. सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी जाधव यांनी ४ लाख ५२ हजार रुपये परतही केले; मात्र त्यानंतर त्यांनी पैसे देणे बंद केले.

नंबर बदलून धमकी

पीडित अभिनेत्रींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी पैसे परत मागण्यासाठी संपर्क साधला तेव्हा आरोपीने आपला मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलला. बराच शोध घेतल्यानंतर त्या डोंबिवली येथे पोहोचल्या असता जाधव यांनी पैसे परत देण्यास नकार देत त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

यानंतर अभिनेत्रींच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश जाधव यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत. आरोपीला लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख