अजित पवारांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 100 views
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीची पुढील दिशा ठरवली जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मुंबईत भाजपकडून नवाब मलिक यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवाब मलिक भाजपसोबत नको, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीमध्येही अस्वस्थता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वबळावर तयारी करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जर मुंबईत महायुतीत सामील न होण्याचा निर्णय झाला, तर त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू महानगरपालिका निवडणुका ठरत असून, त्यातूनच सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जागावाटप, नेतृत्व आणि स्थानिक समीकरणांवरून मतभेद उफाळून येत आहेत. महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट असलं, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मात्र साशंकता निर्माण करणारी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात लढण्याची घोषणा केल्यानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नेमकी कोणती रणनीती असणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांबाबत अजित पवारांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. या दोन्ही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची तयारी असल्याचं त्यांनी सूचक विधान केलं आहे. स्थानिक पातळीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि भाजपविरोधात प्रभावी लढत उभारण्यासाठी हा पर्याय विचाराधीन असल्याचं मानलं जात आहे. मात्र, त्याच वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिकाही अजित पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवार गटाशी संवादाची शक्यता, तर दुसरीकडे स्वबळाचा निर्धार, अशा दुहेरी रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील राजकीय डाव अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे. यामुळे महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडणार का, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित झाला आहे.
